
नागपूर : कामठी येथील जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस शांतिशिल्पाच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान भव्य आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल आणि सांस्कृतिक पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, ओगावा सोसायटी आणि ड्रॅगन पॅलेस यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या तीन दिवसीय सोहळ्यात धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी नागपूरकरांना अनुभवायला मिळणार आहे.
२४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मुख्य वर्धापनदिन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, जपानमधील पूज्य भिक्षू संघाचे प्रमुख तसेच जपान आणि जगभरातील हजारो बौद्ध अनुयायी सहभागी होणार आहेत.
या महोत्सवात नामांकित कलाकारांच्या बुद्ध-भीम गीतांचा लाईव्ह कॉन्सर्ट, सांस्कृतिक मेजवानी, संगीत आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२५ नोव्हेंबर रोजी ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक ‘संविधान जागर’ आणि सामूहिक उद्येशिका वाचनाचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्नही होणार आहे.
ड्रॅगन पॅलेस शांतिशिल्प हे केवळ धार्मिक स्थळ नसून भारत आणि जपान यांच्या मैत्रीचे, शांततेचे आणि मैत्रीपूर्ण संबंधांचे प्रतीक आहे. नागपूरच्या पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या या स्थळाच्या वर्धापनदिनानिमित्त देश-विदेशातील भाविक, अभ्यासक आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कामठीमध्ये २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान शांतता, संस्कृती, बौद्ध विचार आणि आंतरराष्ट्रीय मैत्रीचा संदेश देणारा भव्य सोहळा रंगणार आहे.